कार्यशाळा
बालपणीचे दिवस म्हणजे मनसोक्तपणे खेळण्याचे, धम्माल मस्ती मनोरंजनाचे आणि स्वच्छंदीपणे बागडण्याचे! मुलांचे व्यक्तिमत्त्व हे हळूहळू घडत जाते. प्रत्येक लहान मूल आपल्या अवतीभवती असणाऱ्या गोष्टींचे अतिशय कुतूहलपूर्वक निरीक्षण करत असते आणि त्यातूनच त्याचा हळूहळू बौद्धिक आणि मानसिक विकास होत असतो. सर्वसाधारणपणे लहान मुलांचे व्यक्तिमत्त्व हे ३ ते १० वर्षांच्या कालावधीत घडत असते. या वयात मुलांची निरीक्षण शक्ती कमालीची असते. तसेच याच वयात शारीरिक कौशल्ये देखील विकसित होत असतात. परंतु अनेकदा याच वयात पालकांकडून अवास्तव अपेक्षेपोटी मुलांवर अनावश्यक गोष्टींचा मारा केला जातो. स्पर्धेच्या या युगामध्ये आपल्या मुलाने किंवा मुलीने सर्वोत्तम ठरावे या हव्यासापोटी शाळेव्यक्तिरिक्त विनाकारण क्लासेसचा भडीमार पालकांकडून केला जातो. वास्तविक पाहता, प्रत्येक पालकाने शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आपल्या मुलांना त्यांची आवड, छंद ओळखून ती कला जोपासण्यासाठी वेळ दिला पाहिजे असं तज्ज्ञदेखील म्हणतात.
आणि म्हणूनच मुलांमधील विविध कलाकौशल्ये जपण्यासाठी “दादर संस्कार वर्गा”त ३ ते १४ वयोगटातील सर्व मुलामुलींसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. यात चित्रकला, हस्तकला, मातीकला, गायन, नृत्य आणि अभिनय कार्यशाळा, हस्ताक्षर, निबंधलेखन, कथाकथन, लहान मुलांच्या पाककला, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे, वृक्षारोपण तसेच सहज सोपे विज्ञानप्रयोग, खगोलशास्त्राची ओळख यासारख्या माहितीपर कार्यशाळांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. यात संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली “दादर संस्कार वर्गा”च्या स्वयंसेवकांद्वारे वरील सर्व कार्यशाळांचे उत्तम नियोजन करण्यात येते. खरं तर, मुलांच्या रोजच्या दिनक्रमातून थोडा वेळ काढून त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना आणि कल्पनाशक्तींना वाव मिळावा हाच या कार्यशाळेमागील मुख्य हेतू आहे. मुलंदेखील या कार्यशाळेत अतिशय उत्साहाने सहभागी होऊन त्यांच्या वयाच्या मुलांसोबत प्रत्येक क्षणाचा अगदी मनमुरादपणे आनंद लुटतात!