चित्रकला
निसर्गाच्या विविध रंगांतून रेखाटलेली एक अद्भुत कलाकृती म्हणजे चित्रकला! लहान मुलं आणि चित्रकला नाते फार अनोखे आहे. खरं तर, प्रत्येक मूल शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी अनेकदा चित्रातून आणि त्याच्या रेघोट्यांतून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतं. चित्रातून मुलांनी साधलेला संवाद विलक्षण असतो. दीड-दोन वर्षांची बाळं देखील जेव्हा गोल, चौकोनाच्या रेघोटय़ा काढतात तेव्हा ‘आता मला हा आकार समजतो’, असा संवादच साधत असतात, नाही का? एकूणच मुलांमधील कलेची आवड आणि सृजनशीलता जोपासण्यासाठी चित्रकलेचा वाटा अमूल्य आहे. आणि म्हणूनच बालवयातच मुलांच्या मनावर कलेचे संस्कार करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक गहिरेपण प्राप्त करून देण्यासाठी आमच्या “दादर संस्कार वर्गा”मध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने वयोगट ३ ते १४ मधील सर्व मुलामुलींसाठी चित्रकला वर्गांचे आणि स्पर्धांचे नियमित आयोजन करण्यात येते. चित्रकलेच्या या विविध उपक्रमांतून आणि स्पर्धांमधून मुलांना त्यांच्या मनातील सुप्त विचार, भाव भावना व्यक्त करण्यास, सर्जनशीलता जोपासण्यास तसेच न्यूनगंड, नैराश्य, वैफल्यावर मात करण्यास मदतच होते. यात मुलांमध्ये चित्रकलेबद्दल अधिकाधिक आवड निर्माण करणे, विविध रंगांची, रेषांची, आकारांची ओळख करून देऊन त्याद्वारे मुलांची आकलनक्षमता आणि निरीक्षणक्षमता वाढवणे, क्रेयॉन, चिकणमाती, फिंगरपेंट, वॉटर कलर, चॉकबोर्ड, पुठ्ठा, कॅनव्हासेस इत्यादी सामुग्रीद्वारे चित्रकला आणि भित्तिचित्र कार्यशाळा भरवणे, चित्रकलेद्वारे हस्ताक्षर वळणदार होण्यास प्रयन्त करणे तसेच वेळोवेळी शहरातील नामांकित चित्रकारांना आमंत्रित करून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिबिरे घेणे, चित्रप्रदर्शनास भेटी देणे यासारखे विविध उपक्रम राबवण्यावर विशेष भर दिला जातो. एकूणच वर्गातील हा उपक्रम मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि मानसिक परिपक्वतेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो यात शंकाच नाही!