श्लोक वर्ग (३ ते १४ वर्षांच्या मुलामुलींसाठी)

 भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये श्लोक, सुभाषिते, स्तोत्र यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपण सर्वच जाणतो. हजारो वर्षांपूर्वी महर्षी व्यास, महर्षी वाल्मिकी तसेच शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींसारख्या महान ऋषीमुनींचे योगदान आणि त्यांनी रचलेले ग्रंथ, उपनिषदे, स्तोत्रे, श्लोक, काव्ये याला तोड नाही हेच खरे! प्रत्येक काळात या बहुमूल्य हिंदू संस्कृतीच्या अमूल्य ठेव्याचे महत्त्व कायमच अधोरेखित झाले आहे. आजच्या आधुनिक काळातही त्यातील शिकवण समर्पक ठरते. आणि म्हणूनच हा ठेवा कायम जतन करण्याचा वसा उचलून आणि भावी पिढ्यांना याचे महत्त्व समजण्यासाठी “दादर संस्कार वर्गा”च्या माध्यमातून सर्व वयोगटातील मुलामुलींसाठी नित्यनेमाने श्लोक वर्ग आयोजित केले जातात. तसेच मुलामुलींनी धीरगंभीर आवाजात आणि एकसुरात केलेल्या श्लोक पठणामुळे वर्गातले सारे वातावरण भारून जाते, ज्याचा परिणाम कळत नकळत मुलांच्या निरागस बालमनावर होऊन त्यावर उत्तम संस्कारांची पेरणी होते. एकूणच मुलांच्या जडणघडणीत या श्लोकांचे महत्त्व फार आहे. श्लोक पठणामुळे लहान मुलांची आणि विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढून बुद्धीवर्धन व प्रज्ञावर्धन होते. अशा प्रकारे दादर संस्कार वर्गात श्लोकांच्या माध्यमातून सर्व वयोगटातील मुलांच्या मनाचे आणि शरीराचे स्वास्थ्य टिकवण्यावर तसेच बळकट शरीर आणि मन घडवण्यावर अधिकाधिक भर दिला जातो.