सांस्कृतिक उपक्रम
पालकहो, आजकाल शाळा आणि अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचा बराचसा मोकळा वेळ हा घरीच जात असतो. त्यातही आजकाल टेलिव्हीजन, कॉम्प्युटर, गेमिंग, टॅबलेट या सर्वांच्या अति किंवा गैरवापराने मुलांमध्ये लहान वयातच अनेक समस्या निर्माण होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पण कुठेतरी या आधुनिक उपकरणांच्या अतिवापरामुळे आपली उद्याची पिढी सांस्कृतिकदृष्ट्या बिघडत तर नाही ना? याचा प्रत्येक पालकाने आज खरंच सखोल विचार करणे अत्यंत गरजेचे आहे असे अनेक बालतज्ञांचे म्हणणे आहे.
“दादर संस्कार वर्गा”मध्ये आपल्या मुलांना कला व संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी तसेच त्यांच्यावर नैतिक मूल्यांची आणि चांगल्या विचारांची जडणघडण होण्यासाठी वय वर्षे ३ ते १४ या वयोगटातील मुलामुलींसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीद्वारे विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यावर विशेष भर दिला जातो. या उपक्रमांमध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरेनुसार पोशाख परिधान करून वर्गात सण साजरे करणे, देशभक्तीपर गाणी म्हणणे, शूरवीर आणि स्वातंत्र्यवीरांच्या कथा ऐकवणे, मुलांना ऐतिहासिक गोष्टी आणि माहिती सांगणे, सामूहिकरित्या देवीदेवतांच्या आरत्या, स्तोत्रे, श्लोक म्हणणे, छोटेखानी वार्षिक स्नेहसंमलेनाचे आयोजन, हिंदू नववर्षानिमित्त स्वागतयात्रा/शोभायात्रा किंवा दिंडीचे आयोजन यासारख्या विविध उपक्रमांचे सूत्रबद्ध नियोजन वर्गातील शिक्षकवृंद आणि स्वयंसेवकांद्वारे नियमित करण्यात येते. मुलांसोबत त्यांचे पालकदेखील या उपक्रमांमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहन देतात. एकूणच आजकाल आपल्या आजूबाजूला पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण चालू असताना आपल्या संस्कृतीचे महत्त्व टिकवून आणि लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार रुजवून भविष्यात एक सक्षम, संस्कारी आणि समृद्ध पिढी घडवणे हाच या उपक्रमामागील “दादर संस्कार वर्गा”चा मुख्य उद्देश आहे.