श्री शरद उपाध्ये सरांची प्रकाशने

प्रासादिक श्रीदत्तउपासना

परम भागवत श्री अनंतसुत विठ्ठल तथा कावडीबाबा महाराज यांच्या दत्तप्रबोध या ग्रंथातील अध्याय चौदावा मध्ये आबालवृद्ध वृद्धजनांसाठी अत्यंत सोपी व प्रभावी साधना दिली आहे. दहा ते पंधरा मिनिटात करता येण्यासारखी ही उपासना आणि षोडोपचार मानस पूजा अत्यंत यशदायक, किर्तीवर्धन करणारी, आयुरारोग्य प्राप्त करून देणारी,नाना उपाधींचा नाश करणारी अशी आहे. हा छोटेखानी ग्रंथ वाचून भक्तांना परम शांती प्राप्त झाली आहे.अत्यंत छोटे पण मोठे परिणाम करणारे दत्तात्रेयांची महती सांगणारे लोकप्रिय पुस्तक.

श्रीदत्तप्रबोध

श्री दत्तात्रेयांचा जन्म हा कृतयुगात झालेला असला तरी त्यांच्याकडून चारही युगात अलौकिक कार्य झाले आहे.श्री समर्थ रामदास स्वामींनी दत्तमहात्म्य चे वर्णन केले आहे की….
अवतारी उदंड होती | स्वयेचि मागुती विलया जाती |
तैसी नव्हे दत्तमूर्ती | नाशक कल्पांति असेना |

मोक्ष मार्गावर चालणाऱ्या भक्तांना भरपूर पाथेय दिलेले दत्तमहाराज अयोनीज असून त्यांचे अलौकिक जन्म कथन या ग्रंथात दिले आहे. अत्रिऋषींना स्वतःचे दान दिलेले श्री दत्त आत्रेय म्हणून दत्तात्रेय. आपल्या अनुसूया मातेला दत्तमहाराजांनी केलेले चोवीस गुरूंचे थोरवी व्याख्यान तसेच मातेच्या चाळीस गहन प्रश्‍नांना दिलेली सखोल व समर्पक उत्तरे आणि अनुसया मातेच्या अनुग्रहाचा सोहळा व अंती मातेला जीवनमुक्त करून सिंह्याद्री पर्वताचा निरोप घेऊन गोरक्षनाथांकडे केलेले प्रयाण हे सर्व कथानक अत्यंत मधुर शब्दांत वर्णन केले आहे.दत्तप्रबोध हा ग्रंथ वाचल्यानंतर साऱ्या अध्यात्मिक शंका मिटतात.गुरुचरित्राचा सारांश असलेले आणि भगिनी वर्गाला अत्यंत शुभ अनुभव देणारे दत्त राजांचे गुढ आणि गोड चरित्र.

श्रीदत्तस्तवनामृत

 या पुस्तकावरील सप्तर्षींचे मुखपृष्ठच इतके आकर्षक आहे की त्या सातही परमदिव्य अवतारमूर्तींकडे बघत राहावेसे वाटते.श्री दत्त महाराज हे अत्यंत प्रेमळ, भक्तवत्सल, भक्ताभिमानी आणि स्मर्तृगामी असे दैवत आहे. या देवतेने बोध करण्यापेक्षा जीवनमुक्तीचा प्रबोध केला आहे. श्री दत्तस्मरण अतिशय पुण्यकारक आणि पापनाशक असून ती महान संजीवनी आहे. आड मार्गावर पाऊल पडले असेल तर सांभाळून मार्गावर आणणारे श्री दत्त महाराज आहेत. श्री दत्तप्रबोध हा ग्रंथ लिहिताना प्रत्येक अध्यायाच्या आरंभी अनंतसुत उर्फ कावडीबाबा महाराजांना श्रीगणेश कृपेने स्फुरलेले हे दिव्य स्तवन नित्य वाचणे म्हणजे संसार -सागर तरून जाणे. या पुस्तकातील ओव्या व श्री दत्तमाहात्म्य सार रोज म्हणत राहावे, सर्वत्र संरक्षण होईल.मानवी जीवनातील अनेक संकटांवर मात करणारी सुलभ व स्तोत्रे असलेले उपयुक्त पुस्तक.

अशी जन्मली श्रीनृसिंहवाडी

अनेक भक्त श्री नृसिंहवाडीला जातात. यांत्रिकपणे पादुकांसमोर उभे राहतात.कोरड्या डोळ्यांनी व मनाने नमस्कार करतात.भरभर पळत एखादी प्रदक्षिणा करतात. त्यांना वाडी महात्म्य करणे अशक्य आहे. कृष्णा नदीच्या घाटावरील श्रीनरसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या स्वयंभू, मनोर पादुकांचे महात्म्य आणि त्यांच्या पूजेच्या पहिल्या मानकर्यांची दिव्य कथा वाचल्यानंतर….
कंठी प्रेम दाटे| नयनी निर लोटे| हृदयी प्रकटे ब्रह्मरूप| अशी अवस्था होते. गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे….

आर्त झालो मी तृषेचा | घोट भरीव गा अमृताचा | प्रभू मज कई भेटेल का | माझ्या जीवीचे कोडे कधी उचलले का |
अशी ओढ लागते. म्हणून नरसोबाच्या वाडीला जाण्यापूर्वी हा छोटेखानी ग्रंथ जरूर वाचावा म्हणजे यात्रा सफल होईल.श्री क्षेत्र नृसिंहवाडीची निर्मिती कशी झाली याचे गुढ उकलणारे दिव्य पुस्तक.

श्री नृसिंह माहात्म्य

श्री विष्णूंचा चौथा अवतार असलेला नराचा देह व सिंहाचे मुख असे स्वरूप वर्णन मनाला खूप भावते. हे छोटेखानी पुस्तक व त्यातील महादेवांनी घेतलेली नरसिंहांची नावे जो वाचतो तो पीडामुक्त होऊन मानसिक बळ मिळतो असे भक्तांचे अनुभव आहेत.यातील नरसिंहांची स्तोत्रे व पदे फारच प्रभावी आहेत म्हणून हे नृसिंहमाहात्म्य शुद्ध होऊन नित्य वाचनात ठेवावे.श्री महाविष्णूंच्या चौथा अवताराचे म्हणजे नृसिंहांचे उदात्त चरित्र.

श्री शाकंभरी महात्म्य

श्रीक्षेत्र बदामी या कर्नाटकातील गावी वास्तव्य केलेल्या श्री बनशंकरी महादेवी आदिमातेचे चरित्र अतिशय प्रभावी हृदयस्पर्शी आहे. सर्वत्र दुष्काळ पडला असता स्वतःच्या शरीरापासून शाक म्हणजे भाज्या निर्माण करून आपल्या लेकरांचे पोषण करणाऱ्या मातेचे हे चरित्र वाचताना डोळे पाणावतात. देवी ही शक्तिरूप आहेच पण तिचे मातृहृदय किती हळवे, विशाल व करुणामयी आहे याची अनुभूती शाकंभरी चरित्र वाचताना येते. पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रात याचे रोज पठण करावेच पण नित्य वाचन ही अत्यंत फलदायी.मूळ पीठ असलेली बदामीची बनशंकरी म्हणजे शाकंभरी देवींचे मन प्रसन्न करणारे पुस्तक.

राशीचक्र

ज्योतिषशास्त्रातील १३ मनोरंजक विषयांची व्यवहारोपयोगी मनोरंजक माहिती, द्वादश ग्रहांचे स्वरूप व परिणाम, राशींचे स्वभाव,वैश्विक रंग लहरीने संपन्न विविध मौलिक रत्ने, संख्याशास्त्र, हस्तसामुद्रिक, मुख सामुद्रिक, अक्षर सामुद्रिक, साडेसाती वधूवरांच्या जन्मपत्रिकांचे गुणमेलन, स्वप्नांचा फलादेश इत्यादी विविध विषयांनी सजलेले विद्यार्थ्यांनाच नव्हे तर जाणकारांना ही अत्यंत उपयुक्त ठरलेले विक्रीचा उच्चांक गाठलेले मनोरंजक पुस्तक.

अंतराळातून अंतरंगाकडे

आपल्या स्वभावाला, वृत्तीला साजेसा जोडीदार निवडणे ही सोपी गोष्ट नाही. केवळ चहापोह्यांचा कार्यक्रम करून किंवा उभयतांनी एक-दोनदा भेटून नेटसे काहीही कळत नाही. अख्खे आयुष्य ज्या व्यक्ती बरोबर काढायचे ती व्यक्ती मानसिक, बौद्धिक व लैंगिक अशा तिन्ही पातळ्यांवर सुखावह हवी. राशीपरत्वे व नक्षत्र परत्वे प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. ते समजण्यासाठीच गण, गोत्र, नाडी, नक्षत्र, योनी, मंगळ, षडाष्टक या सर्वांचे शास्त्रोक्त आकलन होणे अत्यंत महत्वाचे असते. केवळ अठरा गुण किंवा छत्तीस गुण जमले म्हणजे झाले हे चुकीचे आहे. म्हणून वरील सर्व मुद्दे तपासताना त्याला वैद्यकीय आधार काय असतो हे या पुस्तकात सखोल समजाविले आहे. प्रत्येकाच्या राशीच्या स्वभावातील बारीक छटा व्यक्त केल्या आहेत. विवाहोत्सुक मुला-मुलींना तसेच पालकांना अत्यंत उपयुक्त पुस्तक आणि ज्येष्ठ नागरिकांना रसिकतेने लिहिलेले धार्मिक लेखही भावतील.

वंदना

साधारण सत्तरीच्या दशकातील तरुण मुलामुलींच्या भावविश्वाचा सुंदर अनुभव या ग्रंथात कथासंग्रहातील कथा वाचून येतो. हृदयाच्या गाभ्यातून उमललेले प्रेम प्रियकरासाठी केवढ्या मोठ्या त्यागाला तयार असते या अनुभूतीने वाचक थक्क होतात. वंदना मधील कथाकथन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना वाचता वाचता भावनावेग अनावर होऊन तो प्रयत्न सोडून द्यावा लागला. लेखक शरद उपाध्ये यांची छोटीशी प्रस्तावना अत्यंत हृदयस्पर्शी आहे. प्रेमभावनेचे उदात्त सादरीकरण पानोपानी अनुभवास येते.लेखक स्वतः ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यासक असल्याने आयुष्याच्या वाटचालीत बदलणाऱ्या विविध ग्रह दशा प्रेमिकांच्या जीवनात कसे चढ-उतार आणतात याचे सूक्ष्म अवलोकन केल्याचे जाणवते.दैवा इतके विस्मयाचे धक्के देण्याचे चातुर्य कोणत्याही लेखकाच्या प्रतिभेत नसेल हे विविध कथांच्या ओघात जाणवते. कॉलेज विश्वात ‘वंदना’ हा कथासंग्रह तरुण-तरुणींमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना भूतकाळात नेणाऱ्या व तरुणाईला भविष्यकाळाची ओढ लावणाऱ्या या कथासंग्रहाला पराकोटीची लोकप्रियता लाभली आहे.अंतःकरणाला विलक्षण चटका लावणार्‍या हळव्या प्रेमकथा असलेले तरुणाईला लोकप्रिय पुस्तक.