गोष्टी

पालकहो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गोष्टींचे विलक्षण आकर्षण असते. कथा किंवा गोष्टी मन लावून ऐकायला आणि वाचायला आपल्या सर्वांनाच मनापासून आवडते. आपल्या बालपणीसुद्धा आई-बाबांनी, आज्जी-आजोबांनी किंवा शाळेमध्ये बाईनी सांगितलेल्या, शिकवलेल्या काही कविता, गोष्टी तर आपल्याला अगदी आजपर्यंत लक्षात आहेत, हो ना? लहानपणी चांदोबा, श्यामची आई सारख्या पुस्तकात वाचलेल्या काही अविस्मरणीय गोष्टींनी आपल्या मनाचा एक हळवा कोपरा आजही व्यापलेला आहे हेही तितकेच खरे! लहान मुलांचे तर सर्व भावविश्वच या गोष्टींनी व्यापून टाकलेले असते. बच्चेकंपनी तर आपल्याकडून गोष्टी ऐकण्यासाठी अक्षरशः अधीर असतात. चिऊ-काऊ, उंदीर-मनीमाऊ, कावळा, पोपट, कुत्रा, माकड, सिंह तर लहानपणीच या बालगोपाळांचे सवंगडी बनलेले असतात. मुलंदेखील  “गोष्ट सांग नाsss…गोष्ट सांग नाsss” म्हणून पालकांना अनेकदा भंडावून सोडतात. एकूणच लहान मुलांच्या आयुष्यात त्यांच्या कोवळ्या मनावर होणाऱ्या उत्तम संस्कारांसाठी परीकथा, बोधकथा, ऐतिहासिक कथा, पंचतंत्र, इसापनीती, हितोपदेश यासारख्या विविध प्रकारच्या गोष्टी अतिशय मोलाची भूमिका पार पाडतात.          आणि म्हणूनच मुलांमधील कथा, गोष्टी ऐकण्याची ही आवड छंद म्हणून जोपासण्यासाठी “दादर संस्कार वर्गा”मार्फत ३ ते १४ या वयोगटातील मुलामुलींसाठी नियमितपणे विविध प्रकाराच्या गोष्टींचे आणि कथाकथनाचे सत्र आयोजित केले जाते. वर्गातील प्रत्येक मुलामुलीच्या वयोमानाचा विचार करून  मुलांना गोष्टी ऐकवल्या जातात. यात प्राणीकथा, सृष्टीकथा, परीकथा, पौराणिक आणि धार्मिक कथा, ऐतिहासिक आणि शूरवीरांच्या कथा तसेच विज्ञानकथा, साहसकथा, स्वातंत्र्यकथा, चरित्रकथा इत्यादी विविध कथा आणि गोष्टींच्या माध्यमातून मुलांचे अधिकाधिक मनोरंजन करण्यावर आणि ज्ञान वाढवण्यावर विशेष भर दिला जातो. वर्गातील शिक्षकांकडून अभिनय आणि चित्रमय पद्धतीने गोष्टी जिवंत करून सांगितल्यामुळे सारीच मुले कल्पनेद्वारे त्यात समरस होऊन जातात. अतिशय प्रभावीपणे आणि मुलांच्या कलेने गोष्टी सांगितल्यामुळे त्या मुलांच्या मनात कायम घर करून राहतात. गोष्टी ऐकताना कळत-नकळत मुलांच्या कानावर नवनवीन शब्द पडल्यामुळे त्यांची शब्दसंपदा, तन्मयता वाढते आणि चंचलपणा कमी होऊन एकाजागी स्थिर बसण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. त्याचबरोबर “दादर संस्कार वर्गा”मार्फत  मुलांमधील स्टेजची भीती घालवण्यासाठी आणि आत्मविश्वास, वक्तृत्त्वकला वाढवण्यासाठी कथाकथनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशाप्रकारे एकूणच “दादर संस्कार वर्गा”त मुलामुलींच्या आवडीनिवडी ओळखून सर्वांगीण विकासावर जास्तीत जास्त भर देऊन त्यांची प्रगती करण्याकडे शिक्षकवृंदाचा अधिक कल असतो.